About Me

About मी मधला 'मी' हा सतत जिंकत जाण्यापेक्षा शिकत जाण्यावर विश्वास ठेवतो.

Sunday, July 5, 2015

"Me" विरुद्ध "मी"

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्यावर बसतो, घुमतो शीळ वाजवतो......
संदीप खरेची हि कविता माझी अत्यंत आवडती. पण हा असा choice आपल्याला आयुष्यात करावा लागेल अस कधी वाटल नाही.ती वेळ आली जेव्हा मी तब्बल ५ वर्षांनंतर परदेशातून मायभूमीत परतणार होतो.
अर्थात मनातल्यामनात मी त्याची पूर्वतयारी करत होतो. मी काय काय मिस करणार आणि काय काय कमावणार हे ब-याच अंशी स्पष्ट दिसत होतो. हा हिशेब किंवा जमा खर्च मनाशी बांधण हे अगदी स्वाभाविक होत. जोडीला आजूबाजूच्या अमेरिका- भारतातल्या मित्रांशी सल्ला मसलती करत होतोच आणि काही आडाखे बांधत होतो.

अमेरिकेतल्या वास्तव्यात एक लेख वाचनात आला. त्याच नाव होत 'एक स्वप्न साकारतंय मायदेशी परतण्याच'.
अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक झालेल्या नि आता भारतात कायमस्वरूपी परत येणाऱ्या एका कुटुंबाशी निगडीत हा लेख माझ्या मनावर जशाचा तसा कोरला गेला. मनाला भावलं ते म्हणजे परदेशात सुख समाधान गाडी बंगला असूनसुद्धा स्वदेशाशी नाळ न तोडायची इच्छा मनाच्या एका कप्प्यात जपून ती प्रत्यक्षत उतरवायची मनोवृत्ती.

फार  उत्सुक नसताना खर तर मला अमेरिकेला याव लागल ! पण हळूहळू अमेरिकाळलो आणि म्हणता म्हणता ५ वर्ष हि अशी भुर्रकन उडून गेली. तरी सुद्धा रोज संध्याकाळचा मित्रांबरोबरचा कट्टा, नर्मदेश्वर मधला cutting चहा, रविवारच क्रिकेट, शिवगर्जना पथकासाठी गुरुजी तालीम-मंडई समोर दिवसरात्र केलेलं ढोलवादन, कार्यकर्ता म्हणून गणपतीच्या मांडवात उशिरापर्यंत थांबून राहण, दिवाळीत नरकचतुर्दशीला पहाटेचा अभ्यंग झाल्यावर घेतलेलं श्रींच दर्शन, शानिपाराहून भल्या पहाटेची बस पकडून सिंहगड पायथ्यापासून ३५ मिनटात सिंहगड चढून जिंकलेली पैज, भन्नाट ट्रेकिंग करताना राजगडावर चांदण्यांच्या सक्षीने जागवलेली चांदरात आणि सह्याद्रीच्या सान्निध्यात घालवलेले असंख्य लाखमोलाचे क्षण हे असे सगळ मला सतत खुणावत राहिलं आणि मी देशाच्या मातीत पाय घट्ट रोवून राहिलो. त्यामुळेच कदाचित कॉलोराडो मला लेह लडाख सारख भासल नि smokey mountain म्हणजे आपला सह्याद्री.

पण ५ वर्ष बहुत बडा Time होता है! आमच्या gang मधले सगळ्यांचेच एकाचे दोन हात होऊन संसारवेलीवर फुल फुलली होतीच पण जुन्या पेठी पुण्यातून आता सर्वजण बाहेर पडले होते. आता तो आमचा कट्टा उरला नव्हता. दर रविवारी न चुकता क्रिकेट खेळणारा आमचा group आता भिडूच उरले नाहीत म्हणून बंद पडला होता. ढोल पथक फुटून दोनाची तीन, तीनाची चार झाली होती. आणि हो सर्वात महत्वाच म्हणजे 'पूर्वीच पुण राहिलं नव्हत' . शहरातल्या ट्राफिक चे वाजलेले तीन तेरा, गाड्यांची गर्दी आणि pollution, महागाई, जुने आठवणीतले वाडे पाडून तिथे झालेल्या उंच इमारती किंवा shopping malls हा विकसित पुण्याचा 'समृद्ध बकालपणा' मनावर आघात करणार होते.

त्यामुळेच कदाचित जेव्हढ वाटत होत तेव्हढ हे स्थित्यंतर सोप नव्हत. ब-याच  सवयी मला unlearn करायच्या होत्या तर अनेक जुन्या गोष्टी नव्याने आत्मसात करायच्या होत्या. ह्या मानसिक जेट लाग मध्ये माझ्यातला अमेरिकन  Me चा भारतीय मी शी झगडा अटळ होता. पण अमेरिकेतल्या आणि भारतातल्या गोष्टींची तुलना करायची नाही हे मी पहिल्यांदाच ठरवल होत. मित्रांशी झालेल्या संवादामुळे किंवा पाहिल्यापासुनाच्या माझ्या social connectivity मुळे हे changes मी आधीपासून anticipate केले होते. उलटपक्षि आता परत आपण आपल्या अनेक सग्या सोयार्यामध्ये परत येणार ह्या भावनेने मी ह्या स्थित्यन्तरासाठी उत्सुक होतो. 

म्हणता म्हणता अमेरिका सोडण्याचा दिवस आला आणि सोडायला आलेल्या सख्या सोबत्यांचा भावपूर्ण निरोप घेऊ मी विमानात बसलो. सामान सुमान रचून झाल्यावर डोळे मिटून शांत बसलो आणि आठवणींची चक्र बरोब्बर उलटी फिरायला लागली.५ वर्षांची अमेरिका वारी झरझर करत क्षणचित्र पहावीत तशी नजरेसमोरून सरकली. तसाच थोडावेळ शांत बसलो आणि आता आपण काही तासात भारतात पोहोचणार ह्या भावनेने मन एकदम हलक आणि प्रसन्न वाटायला लागलं. सहजासहजी पुढच्या अनेक प्रश्नाची उत्तर माझ्यातल्या मी ने मला सुचवली आणि एक दिशा पक्की झाली एक विचार मनाशी बांधला गेला. इथे काय कमावल नि तिथे गेल्यावर काय गमावेन त्यापेक्षा आपल्याला हवं त्याप्रमाणे जगायला मिळणार ह्या भावनेने पुढची वाटचाल करायची होती. एक पक्की खुणगाठ मनाशी बांधून मी भारतात परतलो.

योगायोग असा कि ठीक ५ वर्षांपूर्वी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी अमेरिकेत जाण्यासाठी मी विमानात बसलो होतो आणि पाच वर्षांनी महाशिवरात्रीच्या बरोब्बर एक दिवस आधी मी भारतात परतलो. महाशिवरात्रीच planning झाल होतच. जेट lag ची काही एक परवा न करता मी शिवरात्रोत्सव निमित्त मित्राच्या गावी ‘अहिरे’ मुक्कामी पोचलो. आजच्या दिवशी शिष्यगण सज्जनगडावरून समर्थांच्या पादुका पालखीत घालून घेऊन येतात. नेहमीच्या रितीरिवाजानुसार सर्वात पुढे समर्थांच्या पादुका नि मागे अहिरेश्वर महाराजांची पालखी गावातून फिरली. दिवस सत्कारणी लागलाच पण महाशिवरात्रीचा श्रीखंड नि खिचडी चा प्रसाद खाउन माझ्या भारतागमनाचा श्रीगणेशा झाला !

इथल्या अनेक गोष्टींचा विनाकारण बाऊ करून life miserable करून घेण्यापेक्षा त्याच्याशी मिळतजुळत घेऊन त्यातून एक सुवर्णमध्य काढण्यात मी यशस्वी झालोय. काही ट्रेकर्स मित्रांना बरोबर घेऊन आम्ही दोघे ट्रेकिंग ला जातो तर कधी मित्र मित्र एकत्र येउन BIKE सफरीवर जातो. फिटनेस आणि आवड म्हणून भरपूर cycling तर चालू आहेच आणि cycling चे अनेक गुरुमित्र मार्गदर्शनासाठी आजूबाजूला आहेत. आमचा फोटोग्राफीचा group हि मस्त जमलाय आणि त्यात काही जुन्या काही नवीन लोकांबरोबर दिवस कसा जातो ते समजत नाही. उन्हातान्हाची तमा न बाळगता मनस्वी क्रिकेट खेळण जरी बंद असल तरी तोच ग्रुप दर रविवारी न चुकता कट्ट्यावर सहकुटुंब गप्पा मारायला आणि एकमेकांची खेचायला हजर असतो. आजही बाबांबरोबर शानिवारातून श्रींची मूर्ती आणायला पायीच जातो आणि उत्साहाने दर वर्षी गणेश उत्सवात स्वतःला झोकून देतो. दिवाळीत मातीचा किल्ला करता करता बालपणाच्या स्मृती जागवत नवीन पिढीला ४ गोष्टी शिकवल्याचा आनंदही मिळतो.
ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी मायदेशाशी घट्ट बांधला गेलोय हे मात्र नक्की. त्याची ओढ जराही कमी न होता उलट दुप्पट वाढली आहे. अमेरिकन INTERSTATE वरून मी माझ्या भारतीय highway मध्ये अगदी सहज merge झालोय अस मला वाटत. थोडक्यात एकदम मस्त चाललय आणि आयुष्य जगतोय कारण मला वाटत I am just trying to be ‘मी’ instead of ‘Me’.

1 comment:

  1. मस्त रे! सुवर्णमध्य काढणं जमलंय तुला.

    ReplyDelete